बारामतीचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांची बदली; पंकज भुसे नवीन मुख्याधिकारी
बारामतीत काल नगररचना अधिकारी विकास ढेकळे याला लाचलुजपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यानंतर आज मुख्याधिकारी महेश रोकडे यांची बदली झाली आहे. रोकडे यांच्या जागी पंकज भुसे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दरम्यान,कालच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई नंतर मुख्याधिकाऱ्यांची बदली झाल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
बारामतीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक भगवान चौधर यांच्या एका प्रकल्पाच्या मंजुरीसाठी नगररचना अधिकारी विकास ढेकळे याने पावणे दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. काल सायंकाळी ढेकळे याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने विकास ढेकळे याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान, या घटनेनंतर बारामतीत एकच खळबळ उडाली होती.क्रेडाई या संघटनेने नगररचना अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईचे स्वागत करत नगरपरिषदेत होत असलेल्या त्रासाबाबत प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानंतर आज सायंकाळी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांची बदली झाल्याचे वृत्त समोर आलेआहे.रोकडे यांच्या जागी नगरपरिषद संचालनालयाचे सहाय्यक आयुक्त पंकज भुसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कालच्या घटनेनंतर आज मुख्याधिकारी महेश रोकडे यांची बदली झाल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.