Uncategorized

बारामतीत संतापजनक प्रकार उघडकीस; अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून कारमध्येच अत्याचार

बारामती :- पुण्यात स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बोपदेव घाटात एका मुलीवर तिघांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली होती. तर वानवडीत व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती.

आता बारामतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महाविद्यालयात जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला धमकी देत कारमध्ये बसवून निर्जनस्थळी नेत तिच्यावर कारमध्ये बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने शहर पोलीसांकडे फिर्याद दिली आहे.शारदानगर, माळेगाव येथे रस्त्याच्या बाजूला निर्जनस्थळी हा प्रकार घडला.

 

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी अनिरुध्द उर्फ दादा भालचंद्र त्रिकुंडे (रा. चंद्रमणीनगर, बारामती) याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात शारिरिक शोषण, पॉक्सो, अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार पिडीत मुलगी हि महाविद्यालयात येत असताना आरोपी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येत असे. तेथे पिडीतेला बोलावून कारमध्ये बसवून सोबत घेवून जात होता. तसेच महाविद्यालय सुटल्यावर गेटवरूनच तो तिला कारमध्ये जबरदस्तीने बसवून निर्जनस्थळी नेत होता. तेथे तिला मारून टाकीन अशी धमकी देऊन कारमध्येच तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित करत असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

पुण्यात अल्पवयीन मुलींबरोबरच महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. अज्ञात स्थळी मुलींनी रात्री अपरात्री फिरणेही अवघड झाले आहे. शाळेतील मुलींच्या बाबतीतही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुलींनाही शाळेतील काम करणाऱ्या लोकांकडून धोका असल्याचे काही मध्यंतरीच्या घटनांमधून समोर आले आहे. मुलींच्या सुरक्षेबाबत सरकार, पोलिसांनी ठोस पावले उचलावीत अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे. वारंवार होणाऱ्या घटना थांबवण्यासाठी पोलीस आणि गृहखाते काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button