सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात फौजदारांसह ४ पोलिस निलंबित
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत असताना झाला होता. कोठडीतील मृत्यूप्रकरणी जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि ३ पोलिस असे एकूण ४ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
त्यामुळे जिल्हा पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात याआधीच पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करण्यात आले होते. आता याप्रकरणामध्ये आणखी ४ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे. परभणी शहरातील नवा मोंढा पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या फौजदार कार्तिकेश्वर तुरनर, पोलिस अंमलदार सतीश दैठणकर, मोहित पठाण आणि राजेश जटाळ या चार पोलिसांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आंबेडकरी अनुयायांनी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढला होता. हा लाँग मार्च नाशिकपर्यंत पोहचला होता. पण परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि सुरेश धस यांनी मध्यस्थी केली आणि लाँग मार्च काढणाऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर हा लाँग मार्च स्थगित करण्यात आला. २३ व्या दिवशी आंदोलकांनी लाँग मार्च स्थगित केला. आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर लाँग मार्च स्थगित करण्यात आला. १ महिन्यात सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास नाशिकपासून पुन्हा लाँग मार्च काढण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
परभणीतील हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. सोमनाथ सूर्यवंशीला पोलिस कोठडीत पोलिसांनी केलेल्या माराहामीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या आईने आणि विरोधकांकडून केला जात आहे. सोमनाथला न्याय मिळावा यासाठी आंदोलनं आणि मोर्चे काढले जात आहेत. सरकारकडून देण्यात आलेली मदत देखील त्याच्या आईने घेतली नाही. माझ्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आम्हाला न्याय नाही मिळाला तर मी आत्महत्या करेन, असा इशारा देखील सोमनाथच्या आईने सरकारला दिला आहे.